Skip to content
ट्रस्ट नोंदणी क्र.: महा./ ३६५२०/ को./ फ-३६९५९/ कोल्हापूर
+९१ - ९४२१ १०४८ ३५

शिरोळ ग्रामी मृतपुत्रासी जीवन दिधले तुम्हीच ना । मातेकडूनी औदुबराची सेवा घेतली तुम्हीच ना।।
पिशाच्च पीडा सहज दवडिली शिरोळ ग्रामी तुम्हीच ना । विप्रस्रीयेच्या भक्तिसाठी सुपुत्र दिधले तुम्हीच ना ।।

ता. शिरोळ जि. कोल्हापूर

Menu

इतिहास

श्री दत्तगुरू भोजनपात्र मंदीर, शिरोळ

।। शिरोळग्रामी माध्यान्ह समयी जीवन दिधले तुम्हीच ना “मातेकडूनी औदुंबराची सेवा घेतली तुम्हीच ना ॥
“पिशाच्च पीडा सहज दवडिली शिरोळ ग्रामी तुम्हीच ना ॥ विप्रस्त्रियेच्या भक्तीसाठी सुपुत्र दिधले तुम्हीच ना ॥

कोल्हापूर जिल्ह्याच्या पूर्वेस ४५ कि.मी. अंतरावर श्री दत्तगुरूंच्या पदस्पर्शाने पावन झालेले शिरोळ हे तालुक्याचे ठिकाण आहे. शिरोळपासून दक्षिणेस ५ कि.मी. अंतरावर कृष्णा पंचगंगा नदीच्या संगमावरती नृसिंहवाडी आहे. नृसिंहवाडी हा शिरोळचाच भाग असून गेल्या पंचवीस ते तीस वर्षापासून नृसिंहवाडी स्वतंत्र ग्रामपंचायत अस्तित्वात आली आहे. पूर्वी एकच ग्रामपंचायत होती. शिरोळ गावाला तसा ऐतिहासिक व धार्मिक वारसा लाभलेला आहे. शिरोळमध्ये प्राचीन काळापासून महादेव (कल्लेश्वर) मंदीर, बुवाफन महाराज मंदीर, श्री दत्तगुरु भोजनपात्र मंदीर, हनुमान मंदीर, छत्रपती ताराराणींची गादी आहे अशा या पवित्र ठिकाणी दत्तगुरूंचे द्वितीय अवतार श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचे नृसिंवाडी येथे इ. सन १३६४ ते १३७६ मध्ये १२ वर्षे तपस्येकरीता वास्तव्य होते. श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज पंचक्रोशीत भिक्षेसाठी जात असत. असेच एकेदिवशी महाराज शिरोळग्रामी भिक्षेकरीता अठरा विश्व दारिद्र्य असणाऱ्या श्री गंगाधरपंत कुलकर्णी या ब्राह्मणाच्या घरी आले. उजव्या हातात ब्रह्म, धेनू, नाग, शंख आणि परशुमुद्रा या पांच मुद्रा बांधलेला दंड व डाव्या हातात भिक्षापात्र घेवून संन्याशाच्या नियमानुसार भिक्षेकरीता ॐ हीं असा उच्चार केला. तो शब्द ऐकून घरातून गंगाधरपंताची गृहिणी बाहेर आली व म्हणाली आपण यावे यावे आपलं स्वागत असो. ह्या दर्भासनावर बसावे. पाय धुण्यासाठी पाणी घ्यावे. श्री यती महाराजांनी पाय धुतले पवित्र पाण्याने कमंडलू भरले. यथाविधी आचमन केले व दर्भासनावर बसले. त्या सतिने चरणतीर्थ घेतले त्यांची पुजा केली. आपल्या अंगावर तीर्थ शिंपडून व प्राशन करुन ती कृतार्थ झाली. नंतर त्या गृहिणीने महाराजांना विनंती केली पतीराज काही कारणास्तव बाहेर गेले आहेत ते परत येईपर्यंत थांबावे पती आल्यावर भिक्षा वाढणे योग्य तरीही आपण आपली इच्छा असेल तर तसे सांगावे. पती घरी येण्यापूर्वी भिक्षा घाल अशी आज्ञा झाल्यास तसे मी करीन. श्रीं नी याप्रमाणे प्रेमळ व उदार असे साध्वीचे बोलणे ऐकून हिच्या पतीस अजून माझ्या दर्शनाची योग्यता आलेली नाही. असा विचार करुन लोकांच्या हृदयात वास करणारे प्रत्यक्ष श्री हरीरुप भगवान दत्त महाराज त्या पतिव्रतेला म्हणाले की दुपारची वेळ आहे मी भुकेला आहे. तुझ्या घरात जे उपलब्ध असेल ते शिजवून तु मला लवकर भिक्षा घाल आम्ही शिजवलेल्या अन्नाचे अधिकारी आहोत. असे म्हणताच त्या गृहिणीने घरात जोंधळ्याच्या कण्या शिजवल्या पण कण्या वाढण्यास घरी ताट, पत्रावळ काहीही नाही असे त्या साध्वीचे शब्द ऐकताच महाराजांनी अंगणातून एक मोठी शिळा (दगड) आणली.  पाण्याने धुवून स्वच्छ करुन ठेवली. त्याखाली चौकोनी मंडळ करून घेतले. त्या मंडळावर प्रोक्षण केलेली शिळा ठेवली. शिळेवरती ॐकार काढून ब्राह्मण गृहिणीला म्हणाले, “ह्या पवित्र पात्रात भिक्षा वाढा” सतीने त्यांची आज्ञा ऐकून शिळापात्रावर  कण्या वाढल्या. श्रीहरी भिक्षा भक्षण करुन तृप्त झाले. त्यांनी हातपाय धुतले. आचमन केले व तेथेच ते अंतर्धान पावले. त्यानंतर त्या साध्वीचे पति घरी आले सर्व वृत्तांत ऐकला. भगवान श्री दत्तप्रभूंच्या हाताची बोटे उमटलेले ते शिळापात्र पाहताच प्रत्यक्ष श्री दत्तच आपल्या घरी येवून भिक्षा घेऊन गेले, याचा त्यांना आनंद झाला व ते धन्य झाले. हेच ते भारतामधील दत्तप्रभूंचा आशिर्वाद असलेले एकमेव हस्त पुजास्थान असलेले शिरोळचे भोजनपात्र मंदीर होय.

|| शिरोळ ग्रामीची द्विजनारी ॥ पुत्रा समंध मारी ।। ठेवी कलेवर औदुंबरी ।।
।। म्हणे पाव श्री हरी । उठविली तात्काळ ।। पुत्रा तया ।।

वरील ओवीचा गुरु चरित्र अध्याय क्र. २० व २१ मध्ये शिरोळचा उल्लेख आहे थोरले महाराज प. पू. वासुदेवानंद सरस्वती उर्फ टेंबे स्वामी महाराज यांनी शिरोळ गावातील भोजनपात्राचे महत्व ‘कुमार शिक्षा’ या ग्रंथात सविस्तरपणे लिहिले आहे. आपणही ६५० वर्षानंतर प्रत्यक्ष श्री दत्तमहाराजांची बोटे उमटलेल्या भोजनपात्राचे दर्शन घेऊन धन्य होऊया कृतकृत्य होऊया.

धनधान्ये ना सदनी ना भोजनपात्र । जाड्या भरड्या कणिका आधार मात्र ।।
आरे पाती त्या प्रेमे अमृत सती हस्त। प्रकटे करतल ठसे पाषाणी दत्त ।।

नुकतेच शिरोळच्या भोजनपात्र मंदिराचा जीर्णोद्धार पूर्ण झालेला आहे. मंदिरामध्ये भिंतीस चांदीच्या पत्र्यावर भिक्षा घालणाऱ्या गृहिणीची प्रतिमा व श्रीगुरु भिक्षा घेत असताना दिसत आहेत. या ठिकाणी श्री गुरु तृप्त होऊन आशीर्वाद देऊन गेले त्यामुळे तेथे मागितलेली कोणतीही सांसारिक , भौतिक, आध्यात्मिक भिक्षा श्रीगुरु देतातच अशी श्री दत्तभक्तांची ठाम श्रद्धा आहे. त्यामुळे भक्त येऊन श्रीगुरुचरणी कामनेचे दान मागतात.

श्री दत्तगुरु अन्नछत्र मंडळाची कल्पना व प्रेरणा

श्रीक्षेत्र नृसिंहवाडीस जाताना बरीच भाविक मंडळी शिरोळ येथे श्री दत्तगुरूंच्या हस्तमुद्रेचे दर्शन घेण्यासाठी येत असतात. शिरोळ येथे श्री नृसिंह सरस्वती यांनी स्वतः भिक्षा घेतलेली आहे. परंतु तेथेच परगांवच्या भाविकांसाठी अन्नछत्राची सोय नसल्याची खंत दत्त भक्त मंडळींना लागून राहिली होती. श्री दत्त महाराजांच्या प्रेरणेतूनच श्री दत्तगुरु अन्नछत्र मंडळ स्थापन करण्याची कल्पना सुचली. सन २०१६ पासून दर पौर्णिमेला दुपारी १ वाजता आरती झाल्यानंतर श्री दत्त महाराजांना नैवेद्य अर्पण केल्यानंतर भक्त मंडळींना महाप्रसाद दिला जातो.

32b081a2-1c7b-43d7-a2a7-a7622319b6fb

अन्नछत्राची गुरुपौर्णिमा शुभमुहूर्तावर मुहूर्तमेढ रोवली गेली आहे

ca4cc7e5-217d-46a1-9da9-99aa2ceae79f-500x350

सन २०१६ च्या श्री गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तावर हे अन्नछत्र सुरु झाले. या अन्नछत्राचे “श्री दत्तगुरु अन्नछत्र मंडळ शिरोळ” असे नामकरण करण्यात आले. शासनदरबारी मान्यता असावी ह्या उद्देशाने अन्नछत्र मंडळाचे सुरुवातीस सोसायटी रजिस्ट्रेशन करण्यात आले. नं. कोल्हापूर/ ००००११६/२०१७ / महाराष्ट्र / ३६५२०/कोल्हापूर दि.१०/१०/२०१७ अन्नछत्राचा विस्तार व्हायला लागला. अन्नदानासाठी परगावच्या भक्तांच्या देणग्या यायला लागल्याने ट्रस्ट स्थापनाची आवश्यकता भासु लागली. दत्त भक्तांना सभासद करून घेऊन पब्लिक ट्रस्ट (सार्वजनिकन्यास) ची नोंदणी केली. ट्रस्ट नोंदणी क्रमांक : महा./३६५२०/को./ऋ-३६१५९ / कोल्हापूर त्या वेळेस या सर्वांनी संजय दत्तु माने-पाटील. संस्थापक अध्यक्ष केले व त्यांच्या मार्गदर्शनाखाली श्री दत्तगुरु अन्नछत्र मंडळ, शिरोळ ह्या नावाने ही धर्मादाय संस्था कार्यरत झाली आहे. सुरुवातीस दर पौर्णिमला या अन्नछत्राच्या दत्त कार्यासाठी तसेच परगांवच्या स्वामी भक्तांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेऊन मंदिरानजीकच असलेली ३. ५ गुंठे जागा संचालक मंडळाने खरेदी करुन त्या जागेत अन्नछत्र सुरु करण्याचा निर्णय घेतला. यासाठी श्री. संजय दत्तु माने-पाटील, श्री. संजय आण्णासो चावरे श्री. धोंडीराम जोती दबडे, श्री. सयाजी जगदेवराव पाटील, श्री. आप्पासो आण्णासो पुजारी, श्री. संजय नामदेव माने, श्री. प्रल्हाद तिप्पाण्णा कुंभार, श्री. मनोज पुंडलिक मिणचे, श्री. बाळासो रामचंद्र महात्मे, मोहनराव दत्तात्रय जाधव, चंद्रकांत दत्तात्रय माळी यांनी मोलाची साथ दिली आणि अन्नदानाचे पुण्य कार्य दुप्पट जोराने सुरु झाले. गावातील दत्तभक्त असलेल्या काही मंडळींनी मदतीसाठी हात पुढे केला. त्यामुळे त्यांच्या मदतीने व दत्त भक्तांच्या मिळालेल्या देणग्यांमधून अत्रछत्र सुरु झाले.

अन्नछत्राचे नवीन जागेत स्थलांतर

दिवसेंदिवस अन्नछत्राची व्याप्ती वाढू लागली, परगांवच्या भाविकांचा वाढता प्रतिसाद यामुळे दत्त भक्तांची गर्दी वाढतच चालली त्यामुळे सध्याची असलेली अन्नछत्राची जागा अपुरी पडू लागली मंदिरानजीकच असलेल्या ३.५ गुंठे जागेत अन्नछत्र सुरु करण्याचा निर्णय घेतला. परंतू सदर जागा खरेदी केल्यानंतर बांधकामासाठी आर्थिक निधीची गरज असल्याने वरीलप्रमाणे नियोजित अन्नछत्र मंडळाची इमारत उभी करण्याकरिता संचालक मंडळ श्री दत्त भक्तांकडून बांधकाम निधी उपलब्ध करुन लवकरच नवीन इमारतीत अन्नछत्र सेवा श्री दत्तगुरूंच्या चरणी अर्पण करीत आहोत.

c25e15c0-0967-4f1a-860c-9cb616027498-500x350